अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०१ )

Submitted by Theurbannomad on 16 August, 2021 - 11:04

" आमचं भवितव्य अंधारात आहे आता....सगळं संपलं ! " माझा एक अफगाणी मित्र अतिशय कळवळून माझ्याकडे मन मोकळं करत होता. " खूप सोसलंय आमच्या देशाने....खेळणं केलं आमच्या देशाचं त्या खवीस रशियाने आणि अमेरिकेने....दहशतवादी आम्ही आहोत की ते? तालिबान तयार यांनी केले, आणि मग त्यांना संपवायला हे स्वतःहूनच आमच्या देशात आले...म्हणाले होते लोकशाही आणू...कसली लोकशाही आणली यांनी???" त्याच्या या प्रश्नांना उत्तर द्यायचं माझं धाडस झालं नाही. प्रश्न थेट होते, उत्तरं मलाच काय पण समस्त जगाला माहित होती पण त्यावर तोडगा मात्र कोणाकडेच नव्हता.

अतिशय प्राचीन परंपरा लाभलेला हा देश थेट महाभारत काळापासून आपल्या देशाशी जोडलेला. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी आणि तिचा भाऊ शकुनी हे दोघे ज्या गांधार देशाचे, तो देश म्हणजे अफगाणिस्तानच्या आजच्या ' कंदाहार ' प्रांताचा भाग. चीनपासून आणि भारतापासून आफ्रिकेपर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गावरचा हा देश म्हणजे महत्वाचा टप्पा. चहूबाजूंनी जमिनीने वेढलेला, हिंदुकुश पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला, उणे पंचवीस ते पंचेचाळीस इतकं विषम तापमान सहन करणारा आणि अंगापिंडाने टणक अशा स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षे सांभाळलेला हा देश आज ध्वस्त झालेला बघावा लागतो आहे. या देशाने शेकडो स्थित्यंतरं बघितलेली आहेत. रक्तपात या देशाच्या पाचवीला पुजलेला आहे. कधी काळी भारतावर स्वाऱ्या करणाऱ्या अफगाण सम्राटांचा हा देश आज आचके देत तालिबान्यांच्या हातात घुसमटतो आहे.

या लेखमालेत या देशाच्या इतिहासाबद्दल आणि गेल्या दोन शतकांमध्ये या देशात घडलेल्या गलिच्छ राजकारणाबद्दल मी लिहिणार आहे. माझ्या दुबईमधल्या अफगाण मित्रांनी मला पुरवलेल्या अनेक सुरस आणि प्रसंगी अविश्वसनीय वाटतील अशा अनेक कहाण्या मी लेखनाच्या ओघात प्रस्तुत करणार आहे. माझ्या अफगाण मित्रांमधल्या एकाने काबूलच्या महाविद्यालयातून इतिहास या विषयावर शिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्याच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा मला या लिखाणासाठी प्रचंड फायदा झालेला आहे....त्याच नाव उघड करणं शक्य नसलं तरी त्याचे आभार न मानता पुढे जाणं कृतघ्नपणाचं ठरेल...त्यामुळे त्यालाच ही लेखमाला अर्पण करून मी या लेखनाचा शुभारंभ करतो आहे.

मौरीन दाऊद हे ' न्यू यॉर्क टाइम्स ' साठी मध्यपूर्व भागाच्या जाणकार म्हणून पत्रकारिता करणाऱ्या काही निवडक पत्रकारांमधलं मोठं नाव. तिने आपल्या एका लेखात म्हंटलं होतं, की अफगाणिस्तान ही जागा केवळ महासत्तांचं कबरस्थान नाही, तर राजकारणातल्या गलिच्छ वर्तुळांची हा देश म्हणजे जननी आहे. तिच्या या एका वाक्यात या अभागी देशाचा आजवरचा इतिहास सामावलेला आहे.

अफगाणिस्तानच्या या इतिहासाचा मागोवा घेत घेत इथल्या राजकारणावर पुराव्यांसकट टोकदार भाष्य करण्याचा माझा हेतू काही अंशी जरी सफल झाला, तरी माझ्या इथल्या अफगाणी मित्रांच्या वेदनेला मी माझ्या कुवतीप्रमाणे वाचकांसमोर आणू शकलो याचा मला आनंद होईल. कदाचित या लेखमालेत आधीसारखे पटापट लेख टाकणं मला जमणार नाही, कारण हा विषय अगदी दोन-तीन दिवसांपासून मी हातात घेतलेला आहे आणि मित्रांकडून हाती पडलेले संदर्भ इतके आहेत, की त्यांच्या वाचनातच रोजचे काही तास जात आहेत....परंतु या विषयाशी कुठेतरी मी आतून जोडला गेलो असल्यामुळे मला ही लेखमाला वाचकांसमोर आणल्याशिवाय दुसरा विषय सुचणं अशक्य आहे.

चूकभूल द्यावी घ्यावी आणि लेखमाला कशी वाटली ते पुढे नक्की सांगावं, कारण माझ्या अफगाण मित्रांना काही सेकंदांच समाधान त्या प्रतिक्रिया दाखवून तरी मी देऊ शकेन अशी मला आशा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळी लेखमाला येण्याची वाट पाहतोय. एक थोडी जास्तीची आणि आगावूखोर विनंती. जसे जसे पुढचे भाग प्रकाशित होतील तसे त्यात जे साहित्य संदर्भ म्हणून घेतले असेल तेदेखील शेअर करीत गेलात तर उत्तम होईल. लेखाचा प्रत्येक भाग प्रकाशित करण्याच्या वेळेत सुसूत्रता नसेल तर किमान तुम्ही शेअर केलेले संदर्भ मिळवून वाचणे फायद्याचे ठरेल. अर्थात सगळे संदर्भ इंटरनेट वगैरे वर मिळतील असे नाही पण जे मिळेल ते मिळेल.

व्हिडिओ कसेल भयंकर आहेत. दोन माणसं चक्क चाकावर बसून विमानसोबत वर गेले आणि विमान उंचीवर गेल्यावर पडले. कसंतरी झालं तो व्हिडिओ बघून.

छान सुरुवात. तुमच्या अफगाण मित्रांना सांगा की आपण सर्व जण त्यांच्या सोबत आहोत.
तुमच्या अभ्यासपूर्ण लेखांची उत्कंठा आहे.....

समयोचित लेखमाला ! वाचतेय .. पुलेशु.
बाकी अफगाणिस्तानची शोकांतिका एखाद्या देशाचीही प्राक्तनातून सुटका नसते की काय असं वाटायला लावते.

छान केलंत या विषयावर मालिका लिहायला सुरु करून. सगळीकडून धडकणाऱ्या बातम्या बघून खूप वाईट वाटतंय. अगदी कसंतरी होतेय....विशेषतः तिथल्या महिला आणि मुलांचा विचार करून. किती भयानक आहे अचानक २० वर्षे मागे जायचं कोणतीही चूक नसताना...

अत्यंत नाजुक आणि संवेदनशील विषय आहे हा. तुमच्यासारखा लेखक हाताळणार म्हणून उत्सुकता आणि काही नवीन / माहिती नसलेलं कळेल अशी आशा आहे.
शुभेच्छा!!

पुन्हा एकदा तिथल्या स्त्रिया, मुली सगळे बंदिस्तं !
मुलींना शिक्षणाला बन्दी, एकटे बाहेर पडायला बन्दी, बुरखा कंपलसरी , बेसिक प्रिव्हिलेजेस नाहीत.. १३-१४ वर्षाच्या मुलींकडून सेक्स स्लेव्हरी .. नरकाची डेफिनेशन अजुन काय असेल स्त्रियांसाठी ? Sad

खूप छान. मी वाटच बघत होतो अफगाणवर कोण धागा काढतेय.
आपणच लेखमाला लिहीत आहात तर प्रश्नच नाही.

भारत आपले लोक परत आणण्याच्या खटपटीत आहे. तर तर रशिया आणि चीन तालीबानींशी जुळवून घेणार आहेत.
--
स्त्रियांना शिक्षण वगैरेच्या बाबतीत तालीबानी विरोधी आहेत आणि धार्मिक पद्धतीने समाजात नियम अटी ठेवणार असा अगोदरच्या घटनांतून समज झाला आहे . पण लेखातली पहिली प्रतिक्रिया आमचं भवितव्य अंधारात आहे आता....सगळं संपलं ! " माझा एक अफगाणी मित्र अतिशय कळवळून माझ्याकडे मन मोकळं करत होता. यातून काही वेगळंच चित्र दिसतंय.

नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे, कोणाचं कोणत्या राज्यशाहीत भलं आहे किंवा होणार सगळा संभ्रम आहे.

बघू काय येतंय आगामी लेखमालिकेत.

इस्लामिक पण वेस्टन पद्धतीकडे झुकलेले देश या राज्यबदलाकडे कसे पाहात असतील?

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कशावर अवलंबून आहे? तेलावर आहे का? नसेल तर आयात निर्यात काय आहे? कारण तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

काल ट्विटर वर एका बाईंचे मनोगत वाचले. तिचा मुलगा अमेरिकन सैन्यातून गेला होता . तिथे असताना त्याने इथली तिथली पुस्तके जमा करून एक ऑपरेशन लायब्ररी चालू केले होते. २०१६ मध्ये तो गेला. आता ह्या गोंधळात त्या लायब्ररीचेच विचार मनात येत आहेत. काय झाले असेल? असे माउलीच्या मनात येत होते. ते वाचून अगदी गलबलून आले. मी ते रीट्विट केले होते( एका मातेच मन म्हणून ) त्याला त्यांनी लाइक केले.

इतका पैसा इतके जीव वाया घालवून काय मिळवले?! असफलता हाच नियम आहे अमेरिकन डिफेन्स मानसिकतेचा. त्यांच्या कर्माची फळे दुसरे भोगतात व मरतात सुद्धा. बायडन ची वक्तव्ये हास्यास्पद आहेत.

अगदी आतून तुटतं तिथले हाल बघून. खूप आधी Thousand Splendid Suns म्हणुन पुस्तक वाचलेय, ते वाचतानापण वाईट वाटलेलं, त्याच लेखकाचं (खालिद हुसेनी)Kite Runner आणलंय लायब्ररीतून, पण वाचनाची इच्छा होईना.लेखमाला नक्की वाचेन.

"ज्यांनी फार फार सोसलंय अजूनही सोसत आहेत त्या माझ्या अफगाण मित्र मैत्रीणींना त्यातले काही जिवंत असतील कोणी नसतीलही"
ही प्रतिभा रानडे यांच्या अफगाण डायरी नावाच्या पुस्तकाची अर्पण पत्रिका.

त्यांनी आणि फिरोझ रानडे यांनी लिहिलेल्या लिखाणातून मागच्या पिढीतील अफगाणी लोकांच्या वेदना वाचून माहीत आहेत.

अफगाणिस्तानच्या या इतिहासाचा मागोवा घेत घेत इथल्या राजकारणावर पुराव्यांसकट टोकदार भाष्य करण्याचा माझा हेतू काही अंशी जरी सफल झाला, तरी माझ्या इथल्या अफगाणी मित्रांच्या वेदनेला मी माझ्या कुवतीप्रमाणे वाचकांसमोर आणू शकलो याचा मला आनंद होईल.
>>

हे तुमचे वाक्य वाचून अजून इतक्या वर्षांनंतरही ह्या विषयावर असेच लिहावे लागत आहे हे पाहून फार वाईट वाटत आहे.

लेखमालेच्या प्रतिक्षेत

हे तुमचे वाक्य वाचून अजून इतक्या वर्षांनंतरही ह्या विषयावर असेच लिहावे लागत आहे हे पाहून फार वाईट वाटत आहे.>>>>> +१.

तुमचे लेख मी नेहमी वाचते. पण ही मालिका वाचायची हिंमत सध्या तरी माझ्यात नाही. ह्या शेजारी देशाबद्दल खूप आस्था आहे. कदाचित टागोरांच्या काबुलीवाल्यामुळे असेल. जेव्हा तिथली परिस्थिती सुधारेल तेव्हा ही मालिका वाचून काढेन. 'जर सुधारली तर' असं न म्हणता 'जेव्हा सुधारेल' असं म्हणतेय कारण ह्या देशाला चांगले दिवस येतील अशी आशा अजून आहे. देवावर विश्वास नसला तरी सकारात्मक विचार खूप मदत करू शकतात ह्याची खात्री आहे. तेव्हा माझ्यापुरतं का होईना पण मी हळहळत बसणार नाही. त्याऐवजी रोज ह्या देशाला चांगले दिवस लवकर येवोत अशी प्रार्थना करेन. तशी कल्पना करेन. माझा खारीचा वाटा.

स्वप्ना...किती छान विचार! मलाही असेच वाटते
आणि या निमित्ताने अफगाणिस्तान बद्दल बरीच माहिती मिळतेय...
भारतावर कायम आक्रमण केलं तिथल्या सत्ताधाऱ्यांनी!! फार काही प्रेम नाही..पण सामान्य जनता व विशेषतः स्त्रिया-मुले यांच्याबद्दल कणव वाटते

सुरुवात उत्तम केलीत. अफगाण म्हणले की उंच धिप्पाड, डोंगराळ भागाला सरावलेले लोक. अफगाणी मेवा, काबुली चणे व बलराज सहानी यांनी साकारलेला काबुली चणेवाला.
https://www.youtube.com/watch?v=wCHI-XAhm14

आणी धर्मात्मा मधला फिरोज व हेमा.