गहिरे गोकुळ 1

Submitted by मुक्ता.... on 12 August, 2020 - 10:50

कृष्ण होऊन गेला त्याला हजारो वर्षे झाली. पण अनेक विचार धारा, परंपरा शिकवणुकी, कथा यातून कृष्ण आपल्यातच आहे.

गहिरे गोकुळ हा राधाकृष्ण संवाद कल्पून एक नाट्यमालिका लिहिते आहे. यातील कल्पित राधाकृष्ण संवाद आताच्या भाषिक शैलीला समोर ठेवून लिहिला आहे. राधा आणि कृष्ण हे आधुनिक युगात येऊन जुन्या घटनांचा आणि नवीन घटनांचा चर्चा रूप आढावा घेत आहेत अशी कल्पना आहे.

खालील नाट्यरुप हे केवळ एक विचारमंथन आणि मनोरंजन पर लेखन आहे.

गहिरे गोकुळ....भाग 1

राधा: अरे थांब थांब...थांब रे किती धावशील...कलियुग आलंय...मी आजही तशीच अर्धवट...ही इथेच बसलेय...वाट बघत..

तुला आठवतंय कृष्णा..तू यशोदामाईच्या त्या वाड्यात मोठा झालास..आणि आमच्या मुख्यतः स्त्रियांच्या आशा आकांक्षा ही मोठ्या केल्यास. पुतना ने हल्ला केला. यशोदामाई सांगते, तू खूप सुंदर होती. मोहक पण तरीही वात्सल्य होतं तिच्या डोळ्यांत. तुला जवळ घेऊन दूध पाजलं. काही क्षण ती तुझी झाली. आनंद घेत होती तुझ्या स्पर्शाचा. पण जेव्हा तिला तू ओळ्खल्याचं लक्षात आलं..तेव्हा तिने खरं रूप उघड केलं.सगळेच घाबरले होते. जेव्हा तीचं ते रौद्र रूप पाहिलं. आणि काही काळाने मृत्यूला प्राप्त झाली.

हसण्याचा आवाज येतो..कशाला उगाळत बसते आहेस तू? मी प्रॅक्टिकल होतो डिअर राधा....त

राधा: कृष्णा जोक नाही यार...माझी ऐकून काय अवस्था झाली होती माहितेय? तुला तिने काही केलं असतं तर?

कृष्ण: राधा, तेच तेच नको ग...आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत...प्लिज छान गप्पा करूया...

राधा: डन, अरे आपण आहात कुठे? नवीन बोलूया म्हणतोस, मला इथे यमुनेच्या काठावर बसवलं आणि स्वतः तसाच आधीसारखा लपून बसला आहेस.झाडावर, नाहीतर आणि कुठे...
कान्हा, आता बिसलेरीचा जमाना आहे त्यामुळे नो घागर ....सो प्लिज समोर ये....

कृष्ण : हो पण तुझी मिनरल वॉटर ची बॉटल आणि sling bag कुठाय राधा?

राधा: कान्हा.... ओह देवा...जग बदललं पण कान्हा...

कृष्ण: राधा, मैत्री? ती बदलते का?

राधा: कान्हा, मैत्री? (जोरात हसते)हल्ली वाटत नाही तसं कान्हा....

कृष्ण: का बरं? काय ग? काय झालं? असं एकदम वेगळंच का काही बोलतेस?

राधा: काही नाही, नंतर बोलूया...बोल कसा आहेस? वृंदावनातून गेलास...यशोदामाई खूप रडली. अख्ख गोकुळ रडत राहील

राधा: तुझ्या माझ्या लीला वाचतेय, टीव्हीवर बघतेय..
आताशा जाणवतंय मलाच नवीन तू माझ्यातच गुंतला होतास आणि आताही माझ्यातच आहेस...

हे महाभारत आणि धर्माची स्थापना, नवीन निर्माण सगळं काही झूठ वाटतं ते....

ते काही करायचं नव्हतंच तुला! तुला फक्त आणि फक्त राधातच इंटरेस्ट होता....

(सगळं एका दमात बोलून राधा थांबते आणि मान खाली घालते)

गार वारा सुटला होता, यमुनेच्या त्या डोहात चुकार तरंग होते. वाऱ्याच्या गुदगुल्या कुठे एका ठिकाणी तर वृक्षांची पाने मध्येच पाणी हलवत होती. त्या पानांवर असलेली एखादं दुसरी मुंगी पाण्यात गटांगळ्या खात होती. तसे मोठं मोठे अजस्त्र वृक्ष असल्याने फांद्या एखाद्या तपस्वी प्रमाणे निश्चल होत्या पण पानं मात्र हलकी झुळूक असल्याने सळसळ करत होती.

यातल्या एका आम्रवृक्षाखाली राधा शहाबादी फरशीने बांधलेल्या बांधीव अशा कट्ट्यावर बसली होती.

रणछोड दास अजूनही समोर आले नव्हते. कुठून माहीत नाही पण राधाला कृष्णाचा आवाज मात्र येत होता.

राधा मनोमन विचार करत होती. जमाना बदल गया लेकीन हे महाशय मात्र तोच गनिमी वापरत आहेत!

अचानक समोरून वाऱ्याची एक झुळूक वेगाने पसार झाली. आणि यमुनेच्या पाण्याकडे पहात असलेली पण थोडी लांब असलेली राधा दचकली.

कृष्ण: राधा का थांबलीस? बोल ना...
तुझी शांतता ही हतबलता का प्रतीत होते?

राधा:( हलकीशी हसून)
तुझा माझा हा संवाद कुणी ऐकला तर त्यावर आणि काही यायचं कान्हा!! राधा आणि कृष्ण यांचा शृंगार मर्यादा ओलांडून त्याची कथानके यायची, काव्यरचना यायच्या अशी भीती वाटते रे.तू मनकवडा आहेसच. हताश तर आहेच मी. मला तुझ्या भक्तीची मूर्ती न समजता आता तुझी एक्स या प्रकारात ठेवणं रूढ झालंय कान्हा!!

कान्हा मैत्रीची एकरूपता ही शारीरिक पातळीवर का रे आणली जाते? एकमेकांना आवडणं हे केवळ शृंगारिक असू शकतं का? तुझ्या नावामागे रुक्मिणी का नाही? ती खरी सहधर्मचारणी ना? कान्हा मी गोकुळात राहिले. कारण माझे जीवन मनाने तुझ्या विचारांना समर्पित केले.

गोकुळाला तू शरीराने सोडलं होतंस ,तुझ्या विचारांनी नाही.

(राधाला धाप लागते.)

कान्हा माझी बॉटल दे यार ,घसा सुकला तहान लागलीय, प्लिज माझी बॅग घेऊन समोर ये बरं!

इतक्यात राधेच्या बाजूला एक पोटली येते आणि एक sling bag देखील येते.

कृष्ण : राधा घे. किती उद्विग्न आहेस, किती तळमळत आहेस यार राधा...पहिली शांत हो.
एक एक करून आपण चर्चा करू.

राधेच्या one side पोनीला एक झटका बसतो. आणि धप्प करून कुणीतरी वरून उडी मारत पुन्हा गायब होते.

राधा : कान्हा यु....तुला बघते थांब...(पहिलं पाणी पीत पोटली उघडते, तर आत दोन पिवळे धम्मक आंबे असतात. ते पाहून राधा खुदकन हसते!)

व्वा कृष्णा किती मस्त! म्हणजे इथेच आहेस तर, वर याच झाडावर बसला आहेस, मला कळलं नाही.....मी पण....

(झाडामागून खो खो हसण्याचा आवाज येतो)

कृष्ण: राधा हेच तर आहे ना तुझ्या बोलण्यात तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत राधा!!

राधा: कसं काय ते?

कृष्ण: सांगतो सांगतो.....

क्रमशः

मुक्ता
12/08/2020

श्रीकृष्णार्पणमस्तू

Group content visibility: 
Use group defaults