पहिलं गुलाब

Submitted by तुषार विष्णू खांबल on 8 June, 2020 - 16:47

पहिलं गुलाब

आज सात वर्षे झाली ना रे आपल्या लग्नाला.

हो ना. काळ किती भराभर पुढे सरकतो नाही.

हम्म. लग्नाच्या वालदिवशाच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या नवरोबला. आय लव्ह यु

थँक्स. लव्ह यु टू.

ए तुला आठवते का रे आपली पहिली भेट....

आठवते ना. दादर स्टेशन आणि रडणारी तू. हा हा हा हा

चिडवू नकोस हा आता. माझा भांडायचा अजिबात मूड नाहीय...... सोड.... आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोल ना.... मला ना खूप आवडतं तू सांगत असताना ऐकायला. एखादी गोष्ट ऐकल्याची मज्जा येते. प्लिज सांग ना रे...

काही नाही ग, ऐक.... खरं तर त्यावेळी माझी संध्याकाळची वलसाड ट्रेन ठरलेली असायची. पण त्याच दिवशी नेमकं बॉसने जाता जाता एक शुल्लक काम सोपवलं. म्हणून मग निघायला उशीर झाला.... इकडे स्टेशनला पोचलो तर तुफान गर्दी.... एखादी तरी रिकामी ट्रेन मिळेल या आशेवर येऊन तिथल्या बाकड्यावर बसलो. माणसांचा गोंगाट, ट्रेनच्या अनाऊन्समेंट, इतका कलकलाट होता ना तिकडे आणि त्यातही मला पाठीमागून तुझ्या रडण्याचा आवाज आला. सर्व जण तुझ्याकडे बघत होते आणि त्यात मीही.... तुझा चेहरा नीटसा दिसत नव्हता म्हणून उठून पुन्हा जिन्याकडे जायचं नाटक केलं... पण जेव्हा तुला पाहिलं ना तेव्हाच तू मनात घर केलं होतस. असो.... पण तेव्हाच्या तुझ्या एकंदरीत परिस्थिती वरून काहीतरी विपरीत घडलंय याची कल्पना येत होती..... म्हणून मग ते जाणून घेण्यासाठी मी तुला माझी पाण्याची बाटली देऊ केली आणि नंतर जेव्हा तुला बोलत केलं तेव्हा खरं कारण समजलं

हो ना. किती बावळट होते ना मी तेव्हा.

तेव्हा????

चूप रे.... हा तर काय बोलत होते मी....

बावळट होतीस तू

हा.... त्या मूर्ख मुलासाठी ज्याला मी नाही फक्त माझं शरीर हवं त्याच्यासाठी मी आत्महत्या करायला जात होते. माझ्या मैत्रिणीने मला आधी सावध केलं होतं त्याच्याबद्दल. पण मी नाही ऐकलं तेव्हा.... खरं तर ना त्याच्याबद्दल मला घरी सांगायच होतं. पण कधी हिम्मतच नाही झाली. जर तू तेव्हा माझ्याशी बोलला नसतास ना तर काय झालं असत याची कल्पना सुद्धा मला करवत नाही....

सोड ना..... होत असं..... आपल्या अपेक्षांना तडा गेला की होते दुःख.....

हम्मम..... खरचं देवाचे खुप खुप आभार त्या दिवसासाठी.. आणि आपली दुसरी भेट.... पुन्हा त्याच स्टेशनला

हा... काहीतरी पंधरा वीस दिवसानंतर ना... तुझ्या नवीन जॉबचा पहिला दिवस होता तेव्हा...

बरोबर १८ दिवसानंतर भेट झाली होती आपली. त्या घटनेनंतर मी त्या ऑफिसमधील जॉब सोडून दिला. सुदैवाने नवीन जोंब पण लगेच मिळाला होता.

हा... आणि राणी सरकार पहिल्याच दिवशी जॉबला लेट...

ए गप.... मी वेळेतच निघाले होते... ट्रेन लेट होत्या...

तरी नशीब तुझं ऑफिस माझ्या ऑफिसच्या वाटेवरच होत म्हणून... नाहीतर तिकडे सकाळी टॅक्सी पण मिळाली नसती तुला..

मिळाली असती रे.. तू होतास ना.. माझा लकी चार्म... ऊउममममम्माआ

बास हा आता... जास्त मस्का नको लावू.... आणि आज काय चाललयं.... सगळ्या जुन्या आठवणी बाहेर येतायत.....

काही नाही रे... सहज... पण मला खुप गोड वाटतात त्या आठवणी..…

बरं..... अजून काय काय आठवतंय मॅडमना.....??

आपली प्रत्येक भेट ही वेगळीच असायची.... म्हणजे मी नेमकी काही तरी अडचणीत असायची आणि तू तिथे हजर व्हायचास.... कसं ते देवाला माहीत....
म्हणजे बघ ना मला टीसीने पकडलं तेव्हा, माझा मोबाईल हरवला तेव्हा, आणि तुझी सोबत मला सर्वात जास्त भावली जेव्हा पावसामुळे अचानक ट्रेन बंद झाल्या होत्या आणि आपण ट्रॅक वरून चालत आपापल्या घरी जात होतो तेव्हा..... असाच आपला नवरा असावा असं माझं स्वप्न होत आणि त्यात तू अगदी तंतोतंत फिट बसत होतास... त्यारात्री तुझ्याशी बोलायची खूप इच्छा होत होती... पण माझ्याकडे तुझा नंबर पण नव्हता... आणि कसा असणार... मी तर साधं तुझं नाव पण विचारलं नव्हतं इतक्या दिवसात....

हो ना.... बावळट कुठली....

हा असू दे..... पण त्याच्या दुसऱ्या दिवशी ठरवलं.... तू भेटशील तेव्हा तुझा नंबर आणि नाव आधी विचारायचं..... आणि त्यानंतर काही आपली प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही.... जोवर मी तुझ्या जवळ पोहचायचे तोवर तू पुढे निघून गेलेला असायचास.... रोज तू दिसून भेट होत नव्हती आणि त्यामुळे मी मात्र मनाने तुझ्या अधिक जवळ ओढली जात होती....

बरंच काही आठवतंय ग तुला... मेमरी स्ट्रॉंग आहे तुझी... किती GB चं कार्ड घातलाय डोक्यात काय माहीत.... झालं का की अजून काही आठवतंय

आठवतंय ना.... तू मला केलेला प्रपोझ.... मी नकळतपणे तुझ्या प्रेमात पडले होते... मनाशी पक्कं ठरवलं की आज तुला प्रपोझ करायचं.... म्हणून त्यादिवशी मी लवकर स्टेशनला पोचली होती... एव्हाना तुझ्या ट्रेनची वेळ आणि तुझा ठरलेला डब्बा मला माहित झाला होता.... म्हणून त्याच डब्यासमोर येऊन उभी राहिले... पण नेमका तू तेव्हा त्यात नव्हतास.... मला तर रडायला येणारचं होत इतक्यात पाठीमागे तू दिसलास.... लेमन येल्लो शर्ट आणि मेहंदी ग्रीन कलरची पॅन्ट... हातात गिफ्ट आणि त्यावर ठेवलेलं लाल गुलाब.... तुझ्यावरून माझी नजरच हटत नव्हती..... अगदी तू समोर येऊन उभा राहिला तरीही..... मी काही बोलणार इतक्यात तू ते गुलाब देऊन मला प्रपोझ केलंस.... हा खरंच अनपेक्षित सुखद धक्का होता माझ्यासाठी....

हो.... आवडली तर तू मला पाहिल्याचं दिवशी होतीस... पण एकदा धोका मिळाल्यानंतर तू पुन्हा प्रेम करशील का याची भीती वाटत होती.... शेवटी म्हटलं आज बोलून टाकूया.... आणि केला प्रपोझ.... तुझा मिळालेला होकार हे माझ्या वाढदिवसाच सर्वोत्तम गिफ्ट होत....

आणि माझ्या आयुष्यातलं.... नंतर हिम्मत करून पप्पाला सांगितलं... आधी थोडा रागवला पण नंतर झाला तयार... आणि तो तयार म्हणजे सगळे तयार... आणि तसंही नकार द्यावा असं तुझ्यात काहीही नव्हतं.... त्यानंतर आला तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस... आपल्या लग्नाचा.... रविवार ९ जून २०१३....

हो.... नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती.... मुहूर्ताला नेमका रिमझिम पाऊस सुरू झाला... जणू निसर्ग आपल्यावर अक्षता टाकतोय असा भास होत होता...

खरंच मी स्वतःला खुप भाग्यवान समजते... जर तू मला तेव्हा थांबवलं नसतं तर आयुष्याचे हे सुंदर क्षण मी कधीच अनुभवू शकले नसते.... या सर्वांसाठी ना मला तुझे खरचं मनापासून आभार मानायचे आहेत... थँक यु सो मच....

हम्मम..... पण अशी आभार मानायची संधी तू मात्र मला दिली नाहीस..... तीन वर्षांनी जेव्हा 'प्रीशा' चा जन्म झाला... तेव्हा बाप होण्याचा आनंद फार काळ टिकू दिला नाहीस तू.... अवघ्या काही तासांतच मला एकटं ह्या जगात सोडून निघून गेलीस कायमची.... माझा थोडा देखील विचार नाही केलास..…. इतकी निष्ठुर वागलीस तू....

अरे सोन्या ती वेळच तशी होती.... आई किंवा बाळ एकच वाचू शकले असते डॉक्टर... आणि बाळासाठी तुझ्या डोळ्यातील प्रेम पाहिलं होतं मी... तो आनंद नाही हिरावायचा होता मला.... आणि आहे ना आता प्रीशा तुझ्या सोबत... मग माझ्या वाट्याच सर्व प्रेम तिला दे... आणि मी कुठे नाही गेली रे.... इथेच आहे... तुझ्या मिठीत.... बघ.... आहे ना..…. हम्मम

हम्मम.....

मग ... वेडा कुठला..... अरे बापरे... बोलता बोलता सकाळ कधी झाली समजलं पण नाही.... चल डोळे पूस पाहू आधी..… आईनी असं तुला पाहिलं ना तर त्यांना पण त्रास होईल..… आणि हो..... तुझ्यासाठी एक गिफ्ट ठेवलं आहे.... आपल्या कपाटातील तुझी जी डायरी आहे ना त्यात.... तू मला दिलेलं पहिलं गुलाब.... ते घे आणि नीट जपून ठेव.... आपल्या प्रेमाचा सुगंध अजून दरवळतो त्यात.... चल आता निघते मी..... पुन्हा भेटेन... आज रात्री... काळजी घे स्वतःची...... बाय... लव्ह यु...

तुषार खांबल

Group content visibility: 
Use group defaults

छान ... कॉलेज आणिऑफीस च्या प्रवासातील वलसाड ट्रेनच्या आठवणी जाग्या केल्या तुम्ही. मस्तच ... आवडली.